कृष्णा नदीची माहिती | Krishna River Information in Marathi

Krishna River Information in Marathi

कृष्णा नदीची माहिती

कृष्णा नदी हि दक्षिण भारतामधील प्रमुख नद्यांपैकी एक महत्वाची नदी आहे. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथे होतो. उगमस्थानापासून सुमारे १२८० किलोमीटर चा प्रवास करून कृष्णा नदी पुढे आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.

कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, आन्धप्रदेश व तेलंगणा ह्या चार राज्यातून वाहते, ह्या प्रवासामध्ये ३०० किलोमीटर चे अंतर कृष्णा नदी महाराष्ट्रामधून वाहते. महाबळेश्वर मध्ये उगम पावल्यानंतर कृष्णा नदी पुढे वाई, भुईज, उडतारे, माहुली, सातारा, कराड, औदुंबर, सांगली, नरसोबाची वाडी असा प्रवास करून पुढे कर्नाटक राज्यात प्रवास करते.

कृष्णा खोरे – भौगोलिक क्षेत्र 

राज्यक्षेत्रफळक्षेत्रफळाची टक्केवारी
महाराष्ट्र69425 चौ.कि.मी27%
कर्नाटक113271 चौ.कि.मी44%
आंध्र प्रदेश व तेलंगणा76252  चौ.कि.मी29%
एकूण368055 चौ.कि.मी

कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या | Tributaries of Krishna

Image Source

कुडाळी (निरंजना नदी) – कुडाळी नदी उडतारे येथे कृष्णा नदीला येऊन मिळते, कृष्णा नदीला जाऊन मिळणारी हि पहिली उपनदी आहे.

कोयना – कोयना नदी देखील महाबळेश्वर मध्ये उगम पावते व पुढे कराड येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

उरमोडी    – उरमोडी नदी  सातारा जिल्ह्यतील अनेक ओढे या लहान नद्या एकत्र येऊन बनते व पुढे काशीळ येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

अग्रणी –  अग्रणी नदी सांगली जिल्हातील खानापूर येथे उगम पावते व पुढे कर्नाटक राज्यातील अथणी येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

तुंगभद्रा – तुंगभद्रा नदी कर्नाटक मधील कोड्डि येथे उगम पावते व पुढे आंध्रप्रदेश मधील संगमेश्वर येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते. 

पंचगंगा – पंचगंगा नदी करवीर तालुक्यातील प्रयागसंगम येथे उगम पावते व पुढे नरसोबाची वाडी येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

भिमा – भिमा नदी भीमाशंकर येथे उगम पावते व पुढे  कर्नाटक मध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते.

मलप्रभा – मलप्रभा नदी बेळगाव येथे पश्चिम घाटामध्ये उगम पावते व पुढे कुडाळ संगम येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

मुशी – मुशी नदी अनंतगिरी पर्वतरांगांमध्ये उगम पावते व पुढे तेलंगणामधील वाडपल्ली येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

येरळा – येरळा नदी सातारा जिल्ह्यात उगम पावते व पुढे ब्रह्मनाळ येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

वारणा – वारणा नदी प्रचीतीगड येथे उगम पावते व पुढे सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

वेण्णा – वेण्णा नदी महाबळेश्वर येथे उगम पावते व पुढे संगम माहुली येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

मांड – मांड नदी सातारा जिल्ह्यात उगम पावते व पुढे  उंब्रज येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

दूधगंगा – दूधगंगा  नदी सिंधुदुर्ग येथे उगम पावते व पुढे बेळगाव येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

घटप्रभा – घटप्रभा नदी सावंतवाडी येथे उगम पावते व पुढे  कर्नाटक मधील अलमट्टी येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

कृष्णा नदीवरील प्रमुख धरणे | Dams on Krishna River

कोयना धरण

koyna dam

कोयना धरण सातारा जिल्ह्यातील कोयना नगर येथे बांधण्यात आले आहे. कोयना धरणाचे बांधकाम 1954 मध्ये सुरू झाले व 1967 मध्ये पूर्ण झाले. कोयना हे धरण महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण आहे, या धरणाची उंची 103 मीटर व लांबी 807 मीटर आहे. कोयना धरणाचा जलाशय शिवसागर या नावाने ओळखला जातो,  जलाशयाची पाणीसाठवण क्षमता 105 टीएमसी इतकी प्रचंड आहे. शिवसागर जलाशयाच्या पाण्यापासून येथे वीज निर्मिती केली जाते, एकूण सहा टप्प्यात इथे 2100 मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते, तसेच या जलाशयातील पाणी सिंचनासाठी देखील वापरले जाते. एकूण १२०० हेक्टर क्षेत्र हे कोयना धरणाच्या ओलिताखाली येते. शिवसागर जलाशयाच्या काठाने कोयना हे सुप्रसिद्ध अभयारण्य आहे.

धोम धरण

धोम धरण हे कृष्णा नदीवरील सर्वात पहिले धरण आहे. कृष्णा नदी महाबळेश्वर मध्ये उगम पावल्यानंतर अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरती हे धरण आहे. वाईच्या जवळ असणाऱ्या व धम्म ऋषींच्या आश्रम मुळे प्रसिद्ध झालेल्या धोम गावात हे धरण बांधण्यात आले आहे. इतर धरणाच्या तुलनेने हे धरण लहान  आकारचे आहे, या धरणाची पाणी साठवण क्षमता 14 टीएमसी इतके आहे. या धरणातील पाण्याचा वापर वाई सातारा जावळी खंडाळा आणि कोरेगाव तालुक्यातील शेतीसाठी केला जातो. या धरणाचे बांधकाम 1968 मध्ये सुरू झाले व 1977 मध्ये पूर्ण झाले. धोम धरणाची उंची 62 मीटर व लांबी 71 मीटर आहे. धोम धरणाच्या जलाशययातील पाण्यापासून २ मेगावॅट इतकी विजेची निर्मिती केली जाते.

अलमट्टी धरण

अलमट्टी धरण हे देशातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. हे धरण उत्तर कर्नाटक मधील विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यात आहे. या धरणाचे लालबहादूर शास्त्री धरण असे नामकरण करण्यात आले आहे. 2005 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. अलमट्टी धरणाची उंची 160 मीटर व लांबी 1565 मीटर आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता २०० टीएमसी इतकी प्रचंड आहे. या धरणावर लावण्यात आलेला लाल बहादूर शास्त्री सागर हा नामफलक हा जगातील सर्वात मोठा नामफलक आहे व तो लोणावळ्यातील ऋषिकेश राऊत नामक डिझाईने बनवला आहे.  हा नामफलक बनविण्यासाठी 50 लाख खर्च आला होता व हे काम पूर्ण होण्यासाठी २५ कामगार ४ महिने काम करत होते.

नागार्जुन सागर धरण

नागार्जुन सागर धरण कृष्णा नदीवर तेलंगणा येथे बांधण्यात आले आहे. कृष्णा नदीवरील हे धरण जगातील सर्वात मोठे दगडी बांधकाम असलेले धरण आहे, तसेच नागार्जुन सागर धरणाचा जलाशय हा भारतातील सर्वात मोठा व जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मानवनिर्मित जलाशय आहे. या जलाशयाची पाणी 131 टीएमसी इतकी आहे. नागार्जुन सागर धरणाचे बांधकाम 1955 ते 1970 दरम्यान झाले आहे. या धरणाची उंची 180 मीटर व लांबी १६०० मीटर आहे. नागार्जुन सागर धरणाच्या बांधकामासाठी 133 कोटी रुपये खर्च आला होता. या जलाशयातील पाण्याचा उपयोग सिंचन व वीज निर्मितीसाठी केला जातो. नागार्जुन सागर जलाशयाच्या पायथ्याशी 815 मेगावॅटचा वीज प्रकल्प आहे.

कृष्णा नदीवरील महत्वाचे प्रकल्प | Projects on Krishna River

  • कोयना प्रकल्प – महाराष्ट्र राज्य 
  • तुंगभद्रा प्रकल्प – कर्नाटक राज्य 
  • नागार्जुन सागर प्रकल्प – आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्य

कृष्णा नदीची आरती

समर्थ रामदासांनी कृष्णा नदीची आरती लिहिली आहे

सुखसरिते गुणभरिते दुरितें नीवारी| 

नि:संगा भवभंगा चिद्गंगा तारी| 

श्रीकृष्णे अवतार जलवेपधारी| 

जलमय देहें निर्मल साक्षात हरी|| 

जयदेवी जयदेवी जय माये कृष्णे| 

आलों तुझिया उदरा निरसी मम तृष्णे||१||

हरिहर सुंदर ओघ ऐक्यासी आले| 

प्रेमानंदें बोधें मिळणीं मीळाले| 

ऐशीया संगमीं मिसळोनि गेले| 

रामदास त्यांची वंदी पाऊले|| 

जयदेवी जयदेवी जय माये कृष्णे| 

आलों तुझिया उदरा निरसी मम तृष्णे||१||

तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते खाली कंमेंट्स मध्ये नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *